⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नऊग्रहांनी बदलले जळगाव मनपाचे राजकारण

नऊग्रहांनी बदलले जळगाव मनपाचे राजकारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव महानगरपालिकेत दि. 18 मार्चला सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित. भाजपची सत्ता पायउतार होऊन शिवसेनेच्या सौ.जयश्री सुनील महाजन या महापौर तर भाजपचे बंडखोर कुलभूषण विरभान पाटील हे उपमहापौर होणार हे निश्चित. या दोघांचे मताधिक्य एकूण 75 पैकी 45च्या वर असेल. जळगाव मनपाच्या राजकारणात होणारा हा बदल नऊग्रहांच्या अतिशक्तीशाली अशा योगायोगातून होत आहे.

भाजप अंतर्गत नगरसेवकांची नाराजी दूर करण्याकडे आ.गिरीश महाजन व आ.सुरेश भोळे यांनी दुर्लक्ष केल्यानंतर ‘नऊग्रह मंडळ’ म्हणून स्थापन केलेल्या स्वतंत्र गटातील नगरसेवकांनी अवघ्या सव्वा महिन्यात भाजपच्या सत्तेची ग्रहदशा बदलवून टाकली. या नऊग्रहांची नावेसुद्धा या वृत्तात खाली आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वी शिवाजी नगर उड्डाणपुलाजवळ हायटेंशन केबलच्या स्थानांतराच्या कामाची निविदा निघाली होती. एक कोटी साठ लाख रुपये या कामावर खर्च होणार होते. हे काम महावितरण कडून करावे की मनपामार्फत करावे याविषयी नऊ नगरसेवक आणि भाजप नेत्यांचा वाद झाला होता. तथापि हे काम महावितरणकडे गेल्यानंतर नाराज असलेल्या या नऊ नगरसेवकांनी ‘नऊग्रह मंडळ’ स्थापन केले.

मनपातील भाजपच्या सत्तेची कुंडली बदलायला दिलीप बबनराव पोकळे, कुलभूषण पाटील, सुधीर पाटील (सौ. प्रतिभा यांचे पती), किशोर रमेश बाविस्कर, कुंदन काळे (सौ. रेश्मा यांचे पती), गजानन देशमुख (सौ. प्रतिभा यांचे पती), चेतन गणेश सनकत, नवनाथ विश्वनाथ दारकुंडे आणि भरत सपकाळे (सौ. रंजना यांचे पती) या नऊग्रहांची युती कारणीभूत ठरली. अवकाशातील सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनि, राहू, केतू यांना नऊग्रह मानले जाते. यातील बर्‍याच ग्रहांच्या युतीच्या प्रसंगी विविध प्रकारच्या आपत्ती ओढवत असतात. फलज्योतिषात या नऊग्रहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधिंनी हायटेंशन केबलचे काम महावितरणला दिल्यानंतर भाजपतील नाराज नऊग्रहांनी ‘नऊग्रह मंडळ’ या नावाने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप सुरु केला. याच ग्रुपमध्ये भाजपमधील इतर नाराज नगरसेवकांशी संपर्क सुद्धा सुरु झाला. ‘हा नाराज.. तो नाराज.. आणि सारेच नाराज..’ असे ग्रुपमध्ये सगळेच गोळा होत गेले. ही संख्या जवळपास 25 पर्यंत गेली. तरीसुद्धा भाजपच्या लोकप्रतिनिधींना याची कोणतीही खबरबात नव्हती.

नाराज नगरसेवकांची संख्या जवळपास 30 पर्यंत जाईल हा अंदाज आला. तेव्हा लोकसभेच्या रावेर मतदार संघातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या संपर्कात हे नऊ ग्रह आलेत. त्यांनी मध्यस्थ म्हणून डॉ.सुनील सुपडू महाजन व गजानन मालपुरे यांना सोबत नेले. जळगाव मनपात भाजपचे बिर्‍हाड उचलता येईल हे पारकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सर्वांना मुंबईत सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची भेट घालून दिली. शिवसेनेच्या अशा तोडफोड व जुगाड कार्यात राऊत यांना विशेष रस असतो. त्यांनी जळगाव मनपा संदर्भातील इत्थंभूत माहिती घेतली. नंतर मुख्यमंत्री व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सख्य आणि जळगाव मनपात आ.गिरीश महाजन यांचे नेतृत्व हे लक्षात घेऊन जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकली गेली. महाजन-फडणवीस यांचे जुने हिशोब चुकते करण्यासाठी अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यवाही करण्याचे नियोजन मुंबईत ठरले. याची माहिती शिवसेना गटनेता, शिवसेना संपर्कप्रमुख यांनाही नव्हती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही एन्ट्री उशिरानेच झाली. अशा प्रकारे मुंबईत नियोजन झाल्यानंतर जळगावातून भाजपचे फुटीर नगरसेवक उचलण्याची कार्यवाही सुरु झाली.

जळगाव महापालिकेवर भाजपच्या फुटीर नगरसेवकांची सत्ता आणण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांना कोणताही रस नव्हता. मात्र, सत्ता आणायची तर शिवसेनेच्या महापौरांच्या नेतृत्वात आणि बंडखोरांपैकी एकाला उपमहापौर करुन दोघांच्या नेतृत्त्वात सत्तांतर केले जाईल, असे ठरले. त्यामुळेच शिवसेनेशी निष्ठावंत असलेले सुनील महाजन यांच्या पत्नी सौ.जयश्री आणि ‘नऊग्रह मंडळा’च्या स्थापनेत पुढाकार असलेले कुलभूषण पाटील यांना अनुक्रमे महापौर व उपमहापौरची संधी दिली गेली. शिवसेनेतर्फे अत्यंत शांतपणे सुरु असलेली ही कार्यवाही भाजपला फार उशिरा कळली. तोपर्यंत भाजपतील जवळपास 27 फुटीर मुंबईकडे रवाना झालेले होते.

मित्राने निभावला मैत्रीधर्म

जळगाव मनपात अडीच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता स्थापन व्हावी म्हणून आ.गिरीश महाजन यांनी शिवसेनेतील अनेक नगरसेवक निवडणूकीपूर्वी आयात केले होते. अर्थात तेव्हासुद्धा भाजपने घोडेबाजारच केला होता. जळगाव मनपात सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वात अगोदर नितीन लढ्ढा आणि त्यांच्या नंतर ललित विजय कोल्हे यांना महापौर पदाची संधी मिळाली होती. दोघांच्यावेळी उपमहापौरपदी सुनील महाजन हेच होते. लढ्ढा आणि कोल्हे यांना हनुमानाप्रमाणे महाजन यांनी सहकार्य केले. प्रसंगी एक पाऊल मागे राहून मला हे हवे, किंवा मला ते हवे असा आग्रह महाजन यांनी धरला नाही. कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव नसताना ललित कोल्हे यांची कारकीर्द प्रभावी ठरली. त्यात महाजन यांचा सिंहाचा वाटा होता. मनपातील नऊग्रहांनी भाजपची सत्ता संपुष्टात आणण्याचा चंग बांधल्यानंतर ललित कोल्हे हे जुन्या मित्राच्या मदतीला धावले. ते आणि त्यांच्या सोबत इतर पाच.. शिवसेनावासी झालेत. भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याची सर्वात पहिली उघड प्रतिक्रिया ललित कोल्हे यांनी दिली. ते म्हणाले, ‘भाजपला जय श्रीराम’!

खडसे, जगवाणी यांचे सहकार्य

भाजपची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी ‘नऊग्रह मंडळ’ यांनी प्रयत्न केलेले आहेत. या भाऊगर्दीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणारे आणि भाजपचे निष्ठावंत सुनील वामनराव खडके फुटिरांमध्ये सहभागी झाले. अर्थात हा निर्णय घेण्यापूर्वी खडके यांनी इतरांना खडसेंच्या दारात नेले. तेथे उपमहापौर पद मागण्याचा प्रयत्नही झाला. ते काही जमले नाही. खडके जात आहेत म्हटल्यावर माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांचे समर्थक मनोज दयाराम आहुजा यांनी सुद्धा नऊग्रहांची पालखी खांद्यावर घेतली.

अशा प्रकारे जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या सत्तेचा अध्याय आटोपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ‘नऊग्रह मंडळ’ यांनी निभावली आहे. चलो.. आगे आगे देखो… होता है क्या?

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार

author avatar
दिलीप तिवारी
जेष्ठ पत्रकार आणि आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध