जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ पेट्रोल, डिझेलने भरलेल्या टँकरला आग लागल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाने धाव घेत आग विझवली होती. नगरसेवक अमीत काळे यांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेची दखल घेत सर्वांचा सन्मान केला आहे.
दि.१६ जुलै रोजी रात्री ११ वाजता कालिंका माता मंदिराजवळ १२ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टँकरचे ब्रेक लायनर जॅम होऊन टँकरच्या मागच्या चाकांना आग लागली. त्याच क्षणी जळगांव महानगरपालिकेचे नगरसेवक तथा अस्मि फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काळे हे राष्ट्रीय महामार्गावरून नाशिराबदकडे जात असतांना त्यांना हे टँकर पेटल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूचे लोक टँकरच्या दूर जात असल्याचे पाहून त्यांनी लागलीच जळगांव अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली व अग्निशमन दलाला ०२५७-२२२४४४४ या क्रमांकावर संपर्क केला. अवघ्या ७ मिनिटात अग्निशमन विभागाचे फायर फायटर दाखल झाले व त्यांनी पेटलेल्या टँकर जवळ जाऊन फायर एक्सटीगुशर व पाण्याचा मारा करून लागलीच आग आटोक्यात आणली व शहरात होणारा मोठा अनर्थ टाळला. एका मागे एक असे ३ फायर फायटर घटनास्थळी दाखल झाले. अंगाचा थरकाप उडवणारा असा हा क्षण होता पण अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविल्या धैर्याची दखल नगरसेवक अमित काळे यांनी घेतली व सोमवारी स्वतः अग्निशमन विभागात येऊन अग्निशमन विभागाचे अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, वाहन चालक प्रकाश चव्हाण, राजमल पाटील, गंगाधर कोळी, पन्नालाल सोनवणे, वाहन चालक देविदास सुरवाडे, गिरीश खडके, नितीन बारी, सोपान जाधव, अश्वजित घरडे, तेजस जोशी आदी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.