जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह कोकण,रायगडला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान, मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर तसेच साताऱ्यांसाठीही १९ जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान १७ जुलै रोजी रात्री मुंबईत ११ ते पहाटे ४ या साधारणपणे ५ तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुताश भागात मागील काही दिवसापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नाहीय.
जिल्ह्यात जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही, तसेच जुलै महिनादेखील निम्म्याहून अधिक उलटला असला तरी देखील जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरण साठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत असल्याने जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांच्या साठ्यात केवळ १.०२ टक्केे वाढ होऊ शकली आहे.