जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । लडाख येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले भडगाव येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर आज सकाळी गिरणा तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भडगाव येथील टोणगाव परिसरात राहणारे निलेश सोनवणे हे सन 2010 मध्ये सैन्य दलात महार बटालियनमध्ये भरती झाले होते. जवान निलेश सोनवणे हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना 10 जुलै रोजी सकाळी लेह लडाख येथे वीरमरण आले होते. आज त्यांचे पार्थिव औरंगाबादहून सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर त्यांच्या परिवाराने आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर परिसरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय जवान, जय किसान, वंदे मातरम्, भारत माता की जय, अमर रहे, अमर रहे, निलेश सोनवणे अमर रहे अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, परिसरातील नागरिक, नातेवाईक सहभागी झाले होते. मिरवणूक जाणा-या रस्त्यांवर नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढली होती.
गिरणा तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणा-या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिल्यानंतर ग्रिनिडियाल टी. ए.118 बटालियन, भुसावळ युनिटच्या जवानांनी व त्यानंतर जळगाव पोलीस मुख्यालयातील जवानांच्या तुकडीने आकाशात बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर, पोलीस उपनिरीक्षक पठारे, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह तालुक्यातील व परिसरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, युवा व महिला वर्ग, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.