जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरुवातील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. पण आता पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कुठेही पाऊस झालेला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे.
शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून मोठ्या कष्टाने हंगामाची तयारी केली आहे. परंतू पावसाअभावी शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेलेली आहे. राज्य सरकारने मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे.
आधीच गेल्या दोन वर्षांच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. २०१५ मध्ये राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होतो. तो बऱ्याच ठिकाणी यशस्वीसुद्धा झाला होता. त्याचप्रमाणे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावे अशी विनंती खा.रक्षा खडसे यांनी केली आहे.