
जळगाव लाईव्ह न्यूज । अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. बाजारपेठेत सुकामेव्याच्या दरामध्ये अचानक मोठी वाढ झाल्याने यंदाच्या दिवाळीचा फराळ चांगलाच महागणार आहे. बदाम, काजू, पिस्ता, खसखस यांसारख्या महत्त्वाच्या पदार्थांच्या किंमती कडाडल्यामुळे गृहिणींचे महिन्याचे आणि सणाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
बाजारपेठेत सुकामेव्याच्या दरवाढीचा मोठा परिणाम ग्राहकांवर आणि किरकोळ विक्रेत्यांवर जाणवत आहे. परदेशातील उत्पादक भागांमधील हवामानातील बदलांमुळे उत्पादन घटल्याचा परिणाम बाजारभावावर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या बदाम, काजू आणि इतर सुकामेव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांना यंदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
सुकामेव्याचे दर किलोमागे वाढले
सुकामेव्याच्या दरांमध्ये झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ पोहोचवणारी ठरत आहे. उपलब्ध दरपत्रकानुसार, बदामाचे दर पूर्वी प्रतिकिलो ९२० ते ९६० रुपये होते. आता ते वाढून ११०० ते १२४० रुपये झाले आहेत. दुसरीकडे, काजूचे दर ९६० ते ९८० रुपयांवरून १०४० ते १०६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
खसखस आणि टरबूज मगजही महागले
सुकामेव्याबरोबरच फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर पदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. खसखशीचे दर पूर्वी प्रतिकिलो २,१८० ते २,२०० रुपये होते. आता ते वाढून २,२८० ते २,३०० रुपये झाले आहेत. तर टरबूज मगजाचे दर पूर्वी ६२० ते ६४० रुपये प्रतिकिलो होते. आता ते ८०० ते ८४० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय बडीशेप आणि हळदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. बडीशेपचे दर ५२० ते ५४० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर हळदीचे दर ५०० ते ५२० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले आहेत.
एकीकडे सणाचा आनंद ओसंडून वाहत असताना, दुसरीकडे महागाईच्या झळांमुळे सामान्यांची दिवाळी आर्थिक ताणाखाली येण्याची चिन्हे आहेत. सुकामेव्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे अनेक ग्राहकांना आता दिवाळीच्या खरेदीत सुकामेव्याचे प्रमाण कमी करण्याचा विचार करावा लागत आहे. वाढलेल्या दरांमुळे ग्राहक आणि किरकोळ विक्रेते दोघेही संकटात सापडले असून, यंदाच्या दिवाळीच्या खरेदीत नागरिकांना आपल्या खिशाचा ताळेबंद सांभाळावा लागणार आहे.





