जळगाव जिल्हा

ऑक्टोबरमध्ये जळगाव तापलं! पारा थेट ३८ अंशांवर; का वाढले इतके तापमान?

जळगाव लाईव्ह न्यूज । मान्सून पावसाने माघारी घेतल्यानंतर जळगाव शहरासह जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम असून मागच्या २४ तासात जळगावात तापमानाने मागील विक्रम मोडीत काढला आहे. जळगावमध्ये तापमानाचा पारा तब्बल ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात एवढे तापमान नोंदवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये जळगावमध्ये ऑक्टोबर महिन्यात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, यंदा तापमानाने ३८ अंशांचा टप्पा गाठत हा विक्रम मागे टाकला आहे. दिवसा कडक उन्हामुळे नागरिक हैराण होत असताना रात्री मात्र तापमानात घट होत असल्याने वातावरणात मोठी तफावत जाणवत आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान तीन ते चार वेळा अवकाळी पावसाचीही हजेरी लागणार आहे.

तापमान वाढीचे कारण काय ?

साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडलेल्या पावसामुळे जमिनीत भरपूर ओलावा असतो. ऑक्टोबरच्या कडक उन्हामुळे या पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवा प्रचंड दमट होते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा नेहमीचा दमटपणा गायब आहे. त्याऐवजी थेट कोरडे वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. यंदाचे वर्ष हे ‘सुपर एल निनोचे वर्ष असल्याने सप्टेंबर महिन्यापासूनच तापमानाचा पारा वाढायला सुरुवात झाली होती, ज्याचा सर्वोच्च बिंदू आता ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळत आहे.

दिवसा चटके, रात्री गारवा !

ऑक्टोबर महिना हा पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा ‘संक्रमणाचा काळ’ मानला जातो. सध्या जळगावकरांना याच विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे दिवसा तापमानाचा पारा ३८ अंशांवर आहे, तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात मोठी घट होत आहे. रात्रीचे तापमान थेट १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच दिवसात कडक ऊन आणि हुडहुडी भरवणारी थंडी अशा दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button