काकूंना भेटायला निघाली अन् काळाने घाला घातला! इलेक्ट्रिक बसच्या धडकेत तरुणी ठार

सप्टेंबर 8, 2026 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला भरधाव इलेक्ट्रिक बसने जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामदा फाट्यावर घडली. प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नवेगाव, मेहुणबारे) असं अपघातातील मयत तरुणीचे नाव असून या घटनेमुळे मेहुणबारे आणि नवेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

prachi pawar

मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार सकाळी सुमारे ७.४० वाजता चाळीसगाव येथे राहणाऱ्या आपल्या काकूंना भेटण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास ती जामदा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसने (क्र. एमएच ४९ बी झेड ८२७६) तिला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर प्राची गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तिला रुग्णवाहिकेतून मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे मेहुणबारे आणि नवेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या प्रकरणी प्राचीचे वडील महेंद्र नारायण पवार (वय ६४), सेवानिवृत्त शिक्षक, यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक नीलेश अशोक सोळंके (रा. वलठाण, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now