जळगाव जिल्हाहवामान

जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन; सकाळपासून रिमझिम

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२६ । गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जळगाव शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज, मंगळवार (११ ऑगस्ट) सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, पुढील काही तासात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यातील ३० आणि ३१ जुलैला मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याला सलग तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र होते. दुसरीकडे पावसाअभावी उकाड्यातही वाढ झाली होती.

मात्र आज जिल्ह्याला कोणताही हवामान अलर्ट नसतानाही अचानक पावसाने हजेरी लावली. सकाळपासून जळगाव शहरासह काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. सकाळपासून सूर्यदर्शन न झाल्याने आकाश ढगाळ राहिले आहे.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. सततच्या उघडीपीनंतर सुरू झालेल्या या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा आधार मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. याच वातावरणीय स्थितीमुळे जळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी काही तासात जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे पावसाने पुन्हा जोर धरल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button