येलो अलर्टनंतरही पाऊस नाही; जळगावात आज कशी राहणार स्थिती? वाचा हवामान अंदाज

ऑगस्ट 10, 2026 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२६ । मागील तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरी झाल्या असल्या तरी अपेक्षित जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे एकीकडे पावसाची प्रतीक्षा कायम असताना दुसरीकडे उकाड्यात वाढ झाली आहे.

rain monsoon

जिल्ह्यात आज, सोमवारी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, जोरदार सरींची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून मान्सूनची चाल काहीशी मंदावल्याचे चित्र आहे.

मान्सूनचा ट्रफ सध्या उत्तर भारताच्या दिशेने सरकल्याने महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात तुरळक सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता. सध्या मान्सूनचा प्रभाव दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत अधिक असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पावसाची महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, नागपूर आणि वर्धा यासह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घाट परिसरात नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा विशेष इशारा देण्यात आलेला नाही. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मोठ्या पावसाचा अलर्ट नाही.राज्यात सध्या पावसाची उघडीप पाहायला मिळत असली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत पुन्हा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांचे आता जोरदार पावसाच्या सरींकडे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now