जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे एका गूढ घटनेत ३५ वर्षीय विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात स्वयंपाक करत असताना अज्ञात प्राण्याने चावा घेतल्याचा संशय असून, उपचारासाठी जळगावला नेत असतानाच महिलेने रस्त्यात अखेरचा श्वास घेतला. मनीषा सुरेश पाटील (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मनीषा पाटील या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागील कमरेच्या भागात अचानक तीव्र वेदना जाणवल्या. “मला काहीतरी चावलं आहे,” असे त्यांनी घरातील सदस्यांना सांगताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळील खासगी डॉक्टरांकडे नेले.

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रिक्षातून जळगावकडे रवाना होत असताना पिंपरी गावापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मनीषा पाटील यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी घोणस सर्पाच्या दंशामुळे मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांना पाचारण करून संपूर्ण घराची तपासणी करण्यात आली. मात्र, घरामध्ये कोणताही साप किंवा अन्य विषारी प्राणी आढळून आला नाही. त्यामुळे महिलेला नेमका कोणत्या प्राण्याने चावा घेतला, याबाबत अद्यापही गूढ कायम असून वैद्यकीय अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे.
मनीषा पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पिंपरी बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










