हृदयद्रावक ! अमळनेरमध्ये खदाणीत बुडून ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू

जुलै 7, 2026 9:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२६ । अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सेल्फी काढताना झालेल्या अपघातामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

amlner

मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७, तिघे रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) अशी मृत झालेल्या दुर्दैवी मुलांची नावे असून या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानव, कार्तिक आणि दिनेश हे तिघे मित्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चोपडा रोडवरील खदाण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. खदाणीत पाणी असल्याने ते पाण्यातून चालत एका उंचवट्यासारख्या जागेवर पोहोचले. तेथे मोबाईलवर ‘सेल्फी’ काढत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. आपल्या मित्राला बुडताना पाहून दुसऱ्याने त्याला वाचवण्यासाठी हात दिला, मात्र त्याचाही तोल गेला. या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिसरा मित्रही पुढे सरसावला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणांतच तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अमळनेर पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. खदाणीत पाणी खोल असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. अशातच देवळी येथील धाडसी तरुण दीपक मोरे यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांनी तिन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले.

या घटनेची माहिती शहरात पसरताच सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये शोककळा पसरली. मृत मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now