जळके विद्युत उपकेंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । जळगाव तालुक्यातील जळके विद्युत उपकेंद्र हद्दीत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांमार्फत सध्या ग्रामपंचायतींकडे वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. यासाठी संपर्कासाठी या विद्युत उपकेंद्राला प्रभारी असलेल्या कनिष्ठ अभियंता मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे फोन कॉल घेत नाहीत. तसेच संबंधित विभागातील कर्मचारी यांना गावांमधील जुन्या पाणीपुरवठा विद्युत जोडणीविषयी परिपूर्ण माहिती नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
बहुतेक गावांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विद्युत जोडणी संदर्भात विविध तक्रारी आहेत. त्यात प्रामुख्याने बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत (म्हणजेच वापर नसलेले) विद्युत बिल आकारणी केली जात आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीकडे विज वितरण कंपनीची थकबाकी दिसते,त्यासंदर्भात जळके विद्युत उपकेंद्र परिसरातील जळके, वसंतवाडी, विटनेर, वावडदा, लोणवाडी, सुभाषवाडी, झोपडितांडा व वराड येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ आज रोजी नागरिकांसोबत जळके विद्युत उपकेंद्र येथे संबंधित कनिष्ठ अभियंता यांना भेटण्यासाठी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १२:१५ पर्यंत ताटकळत जळके उपकेंद्रात बसलेले होते.
यासंदर्भात अभियंत्यांना विचारले असता माझ्याकडे अतिरिक्त पदभार आहे,मी आपल्याला माझ्या उपस्थितीची वार व वेळ सांगू शकत नाही, माझ्या सोयीनुसार मी येथील कार्यभार सांभाळेल असे उत्तर संबंधित शिष्टमंडळाला देण्यात आले संबंधित विद्युत उपकेंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी नेमणुकीच्या गावात फक्त वसुली कामी हजर राहत असल्याचे चित्र आहे. विजेसंबंधी येणाऱ्या समस्यांसाठी या विद्युत उपकेंद्रात संपर्कासाठी कोणताही कार्यालयीन नंबर नाही तसेच संध्याकाळी ५ वाजेनंतर या विद्युत उपकेंद्राच्या गावांमध्ये विजेसंबंधी अडचण आल्यास स्थानिक कोणताही कर्मचारी नाही. त्यामुळे मोठा विद्युत अपघात झाल्यास होणाऱ्या जीवित हानिस किंवा नैसर्गिक आपत्तीस कोण जबाबदार राहणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहेत. त्यासाठी वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून हा भोंगळ कारभार थांबवावा अन्यथा येत्या काही दिवसात वीज कंपनीच्या विरोधात मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच कनिष्ठ अभियंता यांच्यापाठीमागे एका राजकीय आमदाराचा वरदहस्त असल्याचे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे म्हणून अभियंता जिथे पदभार आहे तिथे आणि जिथे अतिरिक्त पदभार आहे तिथे दोघे ठिकाणी उपस्थित राहत नाही की काय? असा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे.