जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आढळला. प्रफुल्ल प्रकाश भदाणे (वय ३५) असे मृताचे नाव असून प्रफुल्लचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील प्रफुल्ल भदाणे हा २२ ऑक्टोबरला एका वाहनावर चालक म्हणून गेला होता. तो २४ ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील खंबाळा येथे जेवायला थांबला होता. काही वेळाने प्रफुल्लने त्याचा भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे याला फोन केला. तसेच काही जण मला मारता आहे. मी पळतो आहे असे सांगितले. प्रदीपने प्रफुल्लला मारहाण करणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितला. त्यानंतर प्रदीपने संबधितांना मी पैसे पाठवून देईन प्रफुल्लला दवाखान्यात दाखल करा असे सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवस झाले तरी प्रफुल्ल घरी आला नाही. तसेच त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे प्रदीपने अमळनेर पोलिस ठाणे गाठून हरवल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने प्रफुल्लच्या बंद मोबाइलचे लोकेशन काढून त्या भागातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्या वेळी तेथील पोलिसांनी एक अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगितले.

मृत व्यक्ती प्रफुल्ल असल्याची ओळख पटली. प्रफुल्लच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहे. त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी वरोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रफुल्लचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाइक चंद्रपूरकडे रवाना झाले असल्याची माहिती देण्यात आली.












