जळगावकरांनो सावधान! जिल्ह्यात 51 लाखांचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त

ऑक्टोबर 18, 2025 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ खरेदी करतात. मात्र याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकले जातात. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत जिल्ह्यातून तब्बल ५१ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे.

bhesalyukt

सणासुदीत तेल, तूप, खवा, मिठाई, काजू आणि मसाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा गैरफायदा घेत काही विक्रेते भेसळ करून विक्री करतात. श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणांच्या तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे विशेष अभियान राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत हॉटेल्स, मिठाई दुकानांवर अचानक छापे घातले जात असून मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ११३ संशयित नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यात केलेल्या धडक तपासणीत तब्बल ५१ लाख ३२ हजार ६०२ रुपये किमतीचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे.

जप्त केलेल्या साठ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण खाद्यतेलाचे असून २० हजार ८४८ लीटर तेल जप्त केले आहे. शहरातील विविध ठिकाणावरुन एकूण ११३ नमुने घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली.

भेसळयुक्त खाद्यपदार्थ आरोग्यासाठी धोक्याची घंटा

भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने ही मोहिम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांनी दिवाळीसाठी लागणाऱ्या खाद्य वस्तू (उदा. तेल, तूप, मिठाई, मावा) खरेदी करताना अधिकृत आणि विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करावी, तसेच अन्नपदार्थ विकत घेताना त्यांची गुणवत्ता तपासावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now