जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२५ । नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. जळगाव जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. आज देखील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्हे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला आज पाऊस झोडपून काढणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहवे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील घाटमाथा, साताऱ्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तसंच आज मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
जळगावातही पावसाची हजेरी
जळगाव शहरासह जिल्ह्यात गुरूवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. या पावसामुळे तापमानात सहा पेक्षा अधिक डिग्री सेल्सियसने घट झाली. परिणामी उकाडा पूर्णपणे शून्य झाला. गुरुवारी कमाल तापमान २९.९ तर किमान २५.४ अंशावर होते. ते १८ जून रोजी ३६.५ डिग्री सेल्सिअस इतके होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाने हजेरी लावली नसून हवामान विभागानुसार मान्सून जळगावात पोहोचला असला तरी त्याची पूर्ण सक्रियता अद्याप बाकी आहे.







