जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज पीकविमा कंपनीकडून बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे. कारण हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतात केळी लागवड केली आहे की नाही…? याबाबतची पडताळणी कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पडताळणी दरम्यान सहकार्य केले नसल्याने, या शेतकऱ्यांचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत कृषी विभागाने पीकविमा कंपनीला ५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पडताळणी करून, आपला अंतिम अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा क्षेत्राची पडताळणीसाठी सहकार्य केलेले नाही, अशा शेतकऱ्यांचे पीकविम्यासाठीचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना व विमा कंपनीला अंतिम मुदत देण्यात आली आहे.
राज्य कृषी विभागाकडून बोगस विम्यांच्या तक्रारीनंतर राज्यभरातील फळ पीकविमा क्षेत्राची प्रत्यक्षात बांधावर जाऊन पडताळणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात ५७ हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
पीकविमा कंपनीला ३१ मार्चपर्यंत संपूर्ण क्षेत्राची पडताळणी करून, आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, ३१ मार्चपर्यंत ५७ हजार ९५३ शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची पडताळणी झाली आहे. तर अजून ७हजारहून अधिक शेतकऱ्यांची पडताळणी बाकी आहे. पीकविमा कंपनीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिओ टॅगिंगच्या अहवालानंतर बोगस विमाधारकांबाबत कृषी विभाग अंतिम निर्णय घेणार आहे.