जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । जगभरातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परिणामी देशांतर्गत सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने एक नवीन रेकॉड केला आहे. ऐन लग्नसराईमध्येच सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी महागले. तर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात एका दिवसात १३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आजचे दर नेमंके काय हे जाणून घ्या?

सोमवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या. सोन्याच्या किमतींनी प्रति १० ग्रॅम १,३०० रुपयांनी वाढ नोंदवत नवीन विक्रमी पातळी गाठली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, ९९.९% शुद्धतेचे सोने सलग चौथ्या दिवशी वधारले आहे.
आज सोन्याची किंमत १,३०० रुपयांनी वाढून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचली. गुरुवारी हेच सोने ८९,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने) सोन्याचा सरासरी किरकोळ भावही १,१५३ रुपयांनी वाढून ८०,७०१ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी धुलिवंदनानिमित्त सराफा बाजार बंद होता. चांदीच्या किंमती १३०० रुपांनी वाढून १,०२, ५०० रुपयांच्या सर्वोच्च दरावर पोहचल्या. गुरुवारी चांदींचा दर १,०१,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी म्हणाले की, सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. पण सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका सर्वाधिक सोने खरेदी करत आहेत. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अराजक व्यापार आणि आर्थिक धोरणांमुळे आव्हानात्मक काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे.