जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । आज गुरुवारी जळगाव शहरात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. काल बुधवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. तर जिल्ह्यात वीज पडून काल २ जणांचा मृत्यू झाला होता.
बुधवारी जळगावात दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरु होता. तसेच प्रचंड उकाडा देखील जाणवत होता. अशातच दुपारी २ वाजेपासून जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातही पाऊस पडला. काही उपनगरांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच नाल्याचे पाणी देखील रस्त्यावर वाहत होते. रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली होती.
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची कामे उरकलेली असून आता शेतकऱ्यांना देखील दमदार पावसाची अपेक्षा लागली आहे. मुंबई पाठोपाठ बुधवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने समाधानकारक अपेक्षा जागवल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गुरुवारी २४ किलाेमीटर प्रतितास प्रमाणे हवेची गती राहणार आहे. तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ, उन-सावलीचे राहू शकते. तसेच हवेत ५० टक्के आर्द्रता राहणार आहे. गुरुवारी दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.