जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात मार्च महिन्यात दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३८.४ अंश तर किमान तापमान १७.५ अंशावर गेलं आहे. दरम्यान, राज्यात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

काल मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सियस तर बीड, अहिल्यानगरात ३९ अंश सेल्सियस, त्यापाठोपाठ मुंबई, चंद्रपूर, सोलापुरात ३८ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही तापमानात वाढ झाली असून छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी पारा ३७.४ अंश सेल्सियसवर गेला होता. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १७.४ अंश नोंदवण्यात आले आहे. राज्यात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात १३ व १४ मार्च रोजी ठराविक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
उन्हाळ्यात दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास होत असतो. त्यामध्ये तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणे, बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, अशी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. जळगावात पारा ४८ पर्यंत जात असतो. वाढत्या तापमानात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.