जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषण ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या सिंचनाच्या कामांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती विधानसभेत दिली.

नदी जोड प्रकल्पास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती. आता पुढील प्रक्रिया सुरु असून या नार पार प्रकल्पाचा खर्च ७ हजार १५ कोटी २९ लाख रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ किमी बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. यामुळे ४९ हजार ७६१ क्षेत्र सिंचित होणार आहे.
राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण राज्यात सिंचनाच्या क्षेत्रात मोठे काम गेल्या काही वर्षात करत आहोत. १६० प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंचनाचे प्रकल्प वेगाने सुरु आहोत. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार-२ ही योजना आणली. नदीजोड प्रकल्पही आपण हाती घेतला आहे.
मराठवाड्यात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मराठवाड्यात सिंचन आणि पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू होणार आहे. संभाजी नगर आणि जालना हे औद्योगिक क्लस्टर होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पाण्याची गरज भासणार आहे. नदीजोड प्रकल्पामुळे त्याला फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.