जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून नागरिकांना भामटे विविध प्रकारचे आमिष देऊन गंडवीत असल्याच्या बातम्या दररोज समोर येत आहे. अशीच एक बातमी समोर आलीय. ज्यात जीओ कंपनीतून प्रोजेक्ट मॅनेजर बोलत असल्याचे सांगणाऱ्या महिलेसह तिच्या सहकाऱ्यांनी शेतात मोबाइल टॉवर लावून फायदा होण्याचे आमिष दाखवून ५३ वर्षीय प्रौढाची ३४,६३,१०० रुपयांत फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हे पैसे करारासाठी आयजीएसटी, टॅक्स आदी कारणाने घेतले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंबा गबा परदेशी (वय ५३, रा. राबदरखा, ता. पाचोरा) या खासगी नोकरदाराने दिलेल्या तकारीनुसार अंकिता श्रीवास्तव व तिचा सहकारी राघव कुमार या दोघांविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. परदेशी यांच्याशी अंकिता श्रीवास्तव या महिलेने व्हॉट्सअॅपवरून ६ जुले २०२४ रोजी संपर्क करून ती जीओ कंपनीची प्रोजेक्ट मॅनेजर असल्याचे सांगितले. तसेच तिने व तिचा सहकारी राघव कुमार याने वारंवार संपर्क करून दरमहा २० हजार रुपये उत्पन्न मिळेल असा विश्वास संपादित केला.
कर, टॅक्सच्या नावाने वेळोवेळी भामट्याने सांगितले पैसे भरण्यास
अंकिता व राघव यांनी परदेशी यांना अॅग्रीमेंटसाठी आयजीएसटी भरण्यासाठी तसेच लिंक अॅटेचमेंटसाठी पैसे भरावे लागेल असे सांगितले. तसेच अॅडव्हान्स व मोबाइल टॉवर साहित्याचे ट्रान्सपोर्ट करण्यासह त्यावर टॅक्स भरावा लागेल असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार परदेशी यांनी ३४,६३,१०० रुपये भरले. ते परत मिळाले नसल्याचे परदेशी यांनी सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.