जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. दुषित पाण्याच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. यावरून आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. त्या टीकेला त्यांच्याच भाषेत गुलाबराव पाटलांनी उत्तर दिले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?
सभागृहात आज आदित्य ठाकरे म्हणाले की, आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे. आपण बोटं दाखवून चालणार नाही. त्यामुळे मंत्र्यांना खातं कळलंय की नाही हा मूळ विषय इथे राहतो. मंत्र्यांनी खात्याचा अभ्यास करावा. सत्ताधारी पक्षाचेही अनेक प्रश्न आहेत पण मंत्री उत्तरं देऊ शकत नाही. या प्रश्नाचे उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना अभ्यास करुन उत्तर द्यायला सांगा, अशी खोचक टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता.
आदित्य ठाकरे हे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला. अहो यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ शब्द वापरुन सारवासारव केली.