जळगाव लाईव्ह न्यूज । यावल येथील एसटी आगारात नव्याने १० एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. या एसटी बसेसचे पूजन करीत श्रीफळ वाढवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. पूर्वी आगारात ६१ बसेस होत्या व त्यातील काही बसेस नादुरुस्त झाल्यानंतर नियमित बसफेऱ्यांसाठी तारेवरची कसरत करावी लागायची.

मात्र, आता नवीन बसेस मिळाल्याने आगारातील समस्या सुटली आहे. येथील एस.टी. आगारात परिवहन मंडळाच्या वतीने व रावेर आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नविन १० एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. आगारात दोन टप्प्यात या बसेस दाखल झाल्या. या सर्व नविन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.
आगारात झाल्या ७१ बसेस :
यावल आगारात पूर्वी ६१ एसटी बसेस होत्या. त्यापैकी ४ बसेस या वर्कशॉपमध्ये असून, ५७ बसेसव्दारे आगारातील बस फेऱ्या चालायच्या. यात ही बसमध्ये बिघाड झाल्यास आहे त्याबसेसव्दारे संपूर्ण फेऱ्या पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागायची. मात्र, नविन बसेस मिळाल्याने ही समस्या सुटल्याचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले.