जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२५ । अमेरिकेमधील (America) घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारपेठेवर दिसून येत असून सोन्याच्या (Gold Rate) किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे आता जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे. एकीकडे लग्नसराई सुरु असून याच यादरम्यान आता सोन्याच्या किमतीने उच्च भरारी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. Jalgaon Gold Rate Today

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व सुरू होण्याचे संकेत मिळू लागल्यापासून सोने चांगलेच वधारू लागले होते. गेल्या आठवड्यात १६ व १७ जानेवारी या दोन दिवसांत सोने भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोने ७९ हजारांच्या पुढे गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे काही निर्णय घेतल्याने सुवर्ण बाजारात तेजी सुरू झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात मंगळवारी (२१ जानेवारी) सोने ७९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आणि काल बुधवारी पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली व सोने थेट ८० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तर सोने जीएसटीसह ८३,०१८ रुपयांवर पोहोचले आहे. गतवर्षी ३० ऑक्टोबर रोजी सोन्याने प्रथमच ८०,४०० रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. अडीच महिन्यांनंतर सोने पुन्हा चकाकले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या २२ दिवसांत सोने सुमारे ४ हजारांपेक्षा अधिक महागले आहे. सोने अभ्यासकांच्या मते यावर्षी जून महिन्यापर्यंत २४ कॅरेट सोन्याचे भाव ८५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात. सध्या २२ कॅरेट सोन्याचे दर बुधवारी ७३,८८६ रुपये प्रति तोळा होते. दुसरीकडे बुधवारी जळगाव सराफा बाजारात चांदीचे दर १ हजार रुपयांनी वाढले. ते ९३,०० रुपयांवर गेले.