जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी आणि पनवेल(जि.रायगड)(Panvel) रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत असणार्या पोलीस हवालदार विजय चव्हाण (रा.सुभाष चौक, अमळनेर) यांच्या हत्येबाबतची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या हत्येचे मुख्य कारण म्हणजे विजय चव्हाण यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते, ज्यामध्ये ते अडथळा ठरत होते. या हेत्येचं गूढ ‘गुगल पे (Google Pay)’ वरून केलेल्या २४ रुपयांच्या पेमेंटमुळे उकलले.
विजय चव्हाण हे मूळचे अमळनेर येथील असून ते पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत होते. ते घनसोली येथे राहत होते. तर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे भूषण ब्राम्हणे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोमबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रविण याने गळा आवळून हत्या केली.
हत्येनंतर, आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी १ जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळा ते घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता. मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवत आणि रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे मारेकऱ्यांचा तपास सुरू झाला.
विजय चव्हाण यांच्या ‘गुगल पे’ वरून अंडाभुर्जी हातगाडीवर २४ रुपयांचे ऑन लाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेव्हणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेव्हणा व पत्नीचा मामेभाऊ याने दारू पाजली. पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून मेव्हण्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांना केला.
विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर भूषण ब्रह्मणे यांनी त्यांच्या भावांसोबत मिळून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींमध्ये पूजा चव्हाण, भूषण ब्रह्मणे (२९), प्रकाश चव्हाण (२३) आणि प्रवीण पनपाटील (२१) यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे.