जळगाव जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ‘या’ पिकांच्या लागवडीने शंभरी गाठली..
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, ज्वारी व मका या प्रमुख पिकांच्या लागवडीत शंभरी गाठली आहे. हरभरा, ज्वारी व मक्याची जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
२०२३ च्या हंगामात जळगाव जिल्ह्यात २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली होती, तर यंदा हेच क्षेत्र २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहचले आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा १३२ टक्के पाऊस झाला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावर देखील रब्बी पिकांची लागवड झाली आहे. बहुतेक धरणांमधून रब्बी हंगामासाठी आवर्तनदेखील मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यात ज्वारी ११५ टक्के, हरभरा १०९ टक्के, मका ११९ टक्के गाठली. दुसरीकडे गव्हाचा पेरा ८३ टक्केच झाला आहे.
सध्याचे भाव काय?
हरभरा : हरभऱ्याचे दर गेल्या हंगामात बऱ्यापैकी वाढले होते. मात्र, तेव्हा शेतकऱ्यांकडे मालच उपलब्ध नव्हता. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याचे दर ७ हजारापर्यंत होते. मात्र, पुढील दीड ते दोन महिन्यांत हरभऱ्याची आवक सुरू होणार आहे. त्याआधीच हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. हरभऱ्याचे सद्यःस्थितीत दर ६ हजार रुपये इतके झाले आहेत.
गहू – गव्हाचे दर सध्या स्थिर आहेत. २४०० ते ३२०० रुपयांपर्यंत गव्हाचे दर आहेत.
मका – मक्याची लागवड यंदा चांगली आहे. सद्य:स्थितीत मक्याचे दर १८०० ते २४०० रुपयांदरम्यान आहेत.