एअर गन दाखवून दहशत माजविणारा तरुण जाळ्यात; जळगावात एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांना एअर गन दाखवून दहशत माजवीत असलेल्या 21 वर्षीय तरुणाला, एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एक एअरगन जप्त करण्यात आले आहे, तर त्याच्या साथीदाराच्या घरातून एक गावठी पिस्तूलही हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे आणि त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रीम कॉलनीतील तलाव परिसरात शुभम अनंता राऊत नावाचा तरुण स्वतःजवळ एअर गन बाळगून परिसरात दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय अधिकारी संदीप गावित आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, छगन तायडे, गणेश ठाकरे आणि सिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने शुभम राऊत याची अंग जडती घेतली. या झडतीत त्याच्याकडून एअरगन मिळून आले.
चौकशी दरम्यान, शुभम राऊतने त्याचा मित्र बंटी तायडे याच्याकडे एक पिस्तूल दिल्याची माहिती दिली. मात्र, बंटी तायडे हा मिळून आला नाही आणि त्याच्या घराची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची पिस्तूल पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. शुभम राऊत याला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि योगेश घुगे यांच्यासह सुरू आहे.