जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२४ । काल देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. दरम्यान, खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
माझ्याकडे पूर्वी असलेलं खातच पुन्हा मला मिळाला आहे. राज्यात पाणीपुरवठाच्या योजना या काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहेत. पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खाता देण्यात आले याचा आनंद आहे. पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचा काम करण्याची संधी मिळाली आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
ग्रीड मराठवाडा हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार त्यांचा महाराष्ट्रातील स्वप्नातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. मराठवाडा ग्रीड हा प्रकल्प 30 हजार कोटींचा केंद्राच्या मंजुरीच्या आशेवर त्याचा डीपी आर आम्ही तयार केला आहे. या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आयुष्यभर माझेही नाव त्याला जोडलं जाणार, असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले
त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करणार
राज्यात काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठ्याच्या पाणीपुरवठा योद्धांची कामे हे संथ गतीने सुरू आहे. जी काम थांबले आहे, त्यांना ब्लॅक लिस्ट करून ती पुन्हा कशी सुरू करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचंही मंत्री पाटील म्हणाले.
गुलाबराव देवकरांवर निशाणा
दरम्यान, अजित पवार गटामध्ये प्रवेश मिळत नसल्याने गुलाबराव देवकर भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मतदानाची शाई अजून बोटावरती पुसली गेली नाही आणि त्याआधीच गुलाबराव देवकर यांनी पक्ष बदलवणे सुरू केले आहे. मतदानासाठी खालचा कार्यकर्ता जो त्यांच्यासाठी मत मागत फिरत होता त्यांना न विचारता गुलाबराव देवकर पक्षांतर करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी गळचेपी झाली असेल. गुलाबराव देवकर हा नकली गुलाबराव.. खरा गुलाबराव हा इकडे आहे. गुलाबराव देवकर हे कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असा इशारा देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
संजय राऊत काय मोठा डॉन वाया चालला का?
संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याच्या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी ते माणसं पाठवली होती. हे मी आधीच सांगितलं होतं. संजय राऊत काय मोठा डॉन वाया चालला का? यांना कोण मारेल. आमच्या भरोशावर खासदार झाले म्हणून दोन पोलीस त्यांच्या मागे आहेत. खासदारकी संपल्यावर एक पण पोलीस त्यांच्या मागे दिसणार नाही..