जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून अनेकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले जात आहे. आता अशातच जळगावातून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास मच्छिंद्र पाटील यांना पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून त्यांची १६ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तीन पोलिसांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले असून १६ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकों दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांसह रक्कम घेऊन जाणारा नीलेश अहिरे याचे नाव निष्पन्न झाले. त्यावरून या चौघांसह सचिन धुमाळ या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकारातील फसवणूक झालेले ग्रामसेवक यांना क्रिकेटची आवड असल्यामुळे ते जळगावात चालणाऱ्या प्रिमियर लिग क्रिकेट सामन्यांत खेळतातही. तिथेच त्यांची फलंदाज असलेल्या चिंचोली (ता. जळगाव) येथील सचिन धुमाळ याच्याशी ओळख आणि पुढे मैत्री झाली. त्या मैत्रीतून त्यांनी दोन डिसेंबरला राजस्थानातील खाटू श्याम येथे देवदर्शनाची सहलही केली. तिथेच सचिनने विकास यांना ही अशक्यप्राय गोष्ट सांगितली. असे तिप्पट पैसे करून देणारी व्यक्ती आपल्या संपर्कात असून, लवकरच ती जळगावात येत आहे आणि ही संधी पुन्हा येणार नाही, हेही पटवून दिले. आपणही मोठी रक्कम देऊन ती तिप्पट करून घेणार आहोत, असेही सांगितले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून विकास पाटील यांनी स्वतः जवळचे दोन लाख रुपये आणि पतसंस्थेतून १४ लाख रुपयांचे कर्ज घेऊन १६ लाख रुपयांची रक्कम उभी केली.
सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी ती रक्कम घेऊन ते स्वतःच्या कारने जळगावात आले. पाटील व धुमाळ यांनी ती पैशांची बॅग रेल्वे स्थानकावर नीलेश अहिरे नामक एका व्यक्तीला दिले. काही वेळानंतर दोन पोलिस तेथे आले व अहिरे याला घेऊन गेले. ते पाहून आपली रक्कम गेली, असे सचिन धुमाळ सांगू लागला. या नाट्यमय घटनाक्रमानंतर विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासह शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरुवातीला सचिन धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांना केले निलंबितः
दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल प्रशांत मेढे, योगेश शेळके व दिनेश भोई या तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.