जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतीक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी दुपारी ३ वाजता नागपुरात होत असून यासाठी राजभवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील.महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही मंत्र्यांची यादी निश्चत न झाल्यामुळे इच्छुक आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
मात्र याच दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून 12 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच समोर आले आहे. या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. यामध्ये सहा नवीन चेहऱ्यांना तर माजी मंत्र्यांना सुद्धा संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे. पण या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे.
गुलाबराव पाटीलांनाही फोन
शिंदेसेनेकडून गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, भाजपकडून मंत्र्यांची यादी निश्चत न झाल्यामुळे गिरीश महाजनांची मंत्रिपदी वर्णी लागणार की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
शिवसेनेकडून या 12 नावांवर शिक्कामोर्तब
उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, विजय शिवतारे, आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांची नावे अंतिम झाल्याची माहिती गोगावले यांनी दिली.