जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । राज्यातील जळगावसह सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातील उच्चदाब क्षेत्र आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.
शुक्रवारी जळगाव शहरासह परिसरातील थंडीचा पारा दहा अंशांवर नोंदवला गेला. १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याने जळगावकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
राज्यातील या जिल्ह्यातील तापमानात घट
राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडार या जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० अंशाजवळ आला आहे. पुण्यातील तापमान ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. पुणेकर सध्या पुणे, महाबळेश्वर आणि लोणावळ्यातील थंडीप्रमाणे थंडीचा अनुभव घेत आहेत. तर अहमदनगर, नाशिकमधील निफाड आणि जळगाव या जिल्ह्यात खूपच कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली आहे.
नाशिक, लातूर आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात थंडी वाढल्याने, नागरिक उबदार कपड्यांना पसंती देताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटल्या आहेत. तर पुढच्या आणखीन काही दिवसांमध्ये गारठा वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागकडून देण्यात आली आहे.