जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातही सोमवारी किमान तापमानात एक अंशाने घट झाली असून यामुळे गारठा वाढला आहे. पुढील काही दिवस जळगावसह राज्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जळगावात सोमवारी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. कमाल तापमान ३० अंशांवर होते. २८ नोव्हेंबरपर्यंत जळगावकरांना सकाळी व रात्री गारठा जाणवणार आहे. २९ नोव्हेंबरनंतर थंडीचा जोर कमी होणार आहे. कमाल तापमान या काळात वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवलेली आहे
राज्यात कसं असेल आजचे हवामान?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे.काल उत्तर प्रदेशातील ‘सारसवा’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे वाटते.