जळगाव लाईव्ह न्यूज । नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीवर मतदान करून, या परिसरातून बहुमत देवून विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील यांनी केले.
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मधापूरी, चारठाणा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील मतदारांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, आ. एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष विकासाचे सर्वसमावेशक असे राजकारण केले. सर्वांना समान न्याय दिला. नाथाभाऊंनी मतदारसंघातील गावागावाला डांबरी रस्त्याने जोडले, मोठमोठ्या पुलांचे निर्माण केले, गावांमध्ये अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, बौद्ध विहार, सभगृह, शाळा, अंगणवाडी खोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना इ मूलभूत सुविधांचे निर्माण करून विकासाची गंगा वाहती ठेवली. सर्व कोळी समाज बांधवांना टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वारंवार शासन दरबारी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रोहिणी खडसे या मतदारसंघात गेले पाच वर्ष कार्यरत आहेत. गेल्या निवडणुकीत अल्पमतांनी पराभव झाला तरी त्या कायम जनसेवेत कार्यरत राहिल्या. मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी संपर्क ठेवला.
शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी यांच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्यासाठी सदैव रोहिणीताई खडसे प्रयत्नशील राहिल्या. त्यासाठी त्यांनी गावपातळी ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. नाथाभाऊंच्या तालमीत तयार झालेल्या रोहिणी खडसे यांच्या मध्ये मतदारसंघातील राहिलेले विकास कामे पूर्ण करण्याची जिद्द आणि क्षमता आहे. आ.एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांचे हात बळकट करण्यासाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन निलेश पाटील यांनी केले. यावेळी शारदा खडसे चौधरी यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.