बँकांच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीने घेतला अचानक पेट; दुचाकी जळून खाक
जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक राजेंद्र चौधरी यांच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही मिनिटातच त्यांची दुचाकी जळून खाक झाली.
राजेंद्र चौधरी हे लष्कराच्या सेवेत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना स्टेट बँकेत नोकरी मिळाल्याने ते सेवा बजावतात. ते नेहमी प्रमाणे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामावर आले. सेवा बजावत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास बँकेच्या आवारात दुचाकीने पेट घेतल्याचे समजताच त्यांनी बाहेर धाव घेतली. दुचाकी पेटत असल्याचे त्यांना दिसले.
त्यांनी व सहकारी विवेक भदे आणि नागरिकांनी बाजूला लागलेल्या दुचाकी तातडीने बाजूला केल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला. बँकेच्या जवळ शाळा, मोठे मार्केट, इतर बँका व शासकीय कार्यालये असल्याने आग लवकर आटोक्यात आणणे गरजेचे होते. राजेंद्र चौधरी व विवेक भदे यांनी अग्निशमन यंत्रे वापरून आग विझवण्याचे प्रयत्न केले. नंतर अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले. पण तोपर्यंत राजेंद्र चौधरी यांची दुचाकी (क्र. एमएच.१९- एएच. ५२७५) जळून खाक झाली आहे.