जळगावमधून भाजपतर्फे आमदार राजूमामा भोळे यांना पुन्हा संधी; 10 उमेदवारांची यादी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल वाजले असून यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कोण किती जागांवर निवडणूक लढवेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आज महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीमधील जागावाटपावर चर्चा होणार यावेळी 120 नावांवर अंतिम निर्णय होणार आहे. तत्पूर्वी भाजपकडून 25 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून 10 मतदारसंघातील नावांवर शिक्कामोर्तबही झालं आहे.
विशेष यामध्ये राजूमामा भोळे यांना पुन्हा एकदा जळगाव शहर मंतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते आहे. राजूमामा भोळे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल? याकडे लक्ष लागून होते. परंतु भाजपने पहिल्या दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याचं समजत असून यात जळगावमधून राजूमामा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. तसेच या पहिल्या यादीत भुसावळ आणि रावेर मतदार संघातील उमेदवारांचे नाव देखील आहे.
भुसावळमधून संजय सावकारे यांना देखील पुन्हा उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते आहे. तर रावेरमधून स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे रिंगणात असून त्यांना देखील उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते आहे.
राज्यात यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मनसे देखील स्वतंत्रपणे लढणार आहे. तर राज्यात तिसरी आघाडी देखील उदयास आल्यामुळे राज्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान भाजपकडून कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, ते पाहुयात.
भाजकपडून पहिल्या १० उमेदवारांची घोषणा?
नंदुरबार – विजयकुमार गावीत
कोथरूड- चंद्रकांत पाटील
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस
धुळे ग्रामीण – सुभाष भामरे
धुळे शहर – अनुप अग्रवाल
रावेर – अमोल जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव – सुरेश भोळे
शहादा – राजेश पाडवी
सिंदखेडा – जायकुमार रावल