जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२४ । नवीन घर घेण्यासाठी माहेरून ६ लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्यांनी छळ केल्यानंतर वारंवार मारहाण केल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विदगाव ते जळगाव रस्त्यावरच्या तापी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ रोजी घडली. भारती मुकुंदा सोनवणे (वय ३०, रा. पिंप्री, ता. चोपडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. विवाहितेच्या आईच्या फिर्यादीवरून पती, सासू व दिराविरुद्ध तालुका पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या कांचननगर येथील प्रमिला इंगळे यांची कन्या भारती हिचे ३ जून २०१३ रोजी पिंप्रीतील मुकुंदा सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नाचे काही दिवस उलटल्यानंतर पती, सासू मंगलाबाई, दीर धुक्तेज यांनी कौटुंबिक अडचणीचे कारण सांगत भारती यांना माहेरून पैसे आणण्यास सांगितले. त्यानुसार भारती यांनी ५ हजार, ७ हजार तसेच एकदा १० हजार रुपये आणून दिले. यानंतर नवीन घर घेण्यासाठी ६ लाख रुपये माहेरून आणण्यास सांगितले. त्यानुसार साडेचार लाख रुपये आणून देखील भारती यांनी पूर्ण रक्कम आणली नाही म्हणून पती, सासू व दीर हे वारंवार शिवीगाळ व मारहाण करत होते.
अखेर या जाचाला कंटाळून भारती यांनी ९ ऑक्टोबर रोजी विदगाव ते जळगाव रस्त्यावरच्या तापी पुलावर येऊन नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मृत भारती यांच्या आईच्या फिर्यादीवरून पती, सासू व दिराविरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.