जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, त्याची पाळेमुळे मध्य प्रदेशपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी जामनेर येथील आणखी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३५०० रुपयांच्या २७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आता चार संशयितांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावल येथील चेतन सावकारे व नईम शेख या दोघांना बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आली होती. तपास केल्यानंतर नरजील नासीर खान (वय ३०, रा. मदनीनगर घरकुल, जामनेर) व गनी मजीद शेख (वय ४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) या दोघांचा सहभाग आढळला. त्यांनाही अटक केली असून नजरीलकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या २७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच बहऱ्हाणपूर येथून हकीम मोहम्मद अमीन व जुबेर असरफ अन्सारी यांच्याकडून नोटा घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता जुबेर बेपत्ता आहे. तर हकीम हा दुसऱ्या एका गुन्ह्यात खंडवा कारागृहात आहे.
चौघांना १६ पर्यंत पोलिस कोठडी बनावट नोटांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना हकीमला अटक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोमवारी सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी अटकेतील चौघांना न्यायालयात हजर केले. हकीमचा कारागृहातून ताबा घेणे तसेच जुबेरचा शोध घेण्यासाठी संशयितांच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी त्यांनी न्यायाधीश एम. एम. बढे यांच्याकडे केली. सुनावणीअंती चौघांना १६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले.