जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्यावर भरधाव कारने जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. कांतीलाल ऊर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०, दोन्ही रा. विटनेर तांडा, ता. जळगाव) अशी मयतांची नावे असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा येथील राहणारे कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे दोघे गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक नंबर (एमएच १९ इएल ३११) ने शिरसोलीकडून जळगावकडे येत होते. याच दरम्यान, शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रच्या टावर समोरून भरधाव कारने जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान विटनेर तांडा गावावर शोककळा पसरली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.