जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । राजधानी एक्स्प्रेसला भुसावळात थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे २२२२१ मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ही दिल्लीकडे जाणारी गाडी १० ऑक्टोबरला दोन मिनिटे भुसावळला थांबली. या गाडीला शुक्रवारी (दि.११) केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या भुसावळात हिरवी झेंडी दाखवणार आहेत. गुरुवारी हे नियोजन होते. पण, उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा असल्याने हा कार्यक्रम शुक्रवारी होईल.
भुसावळ मार्गे धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला यापूर्वी जळगाव येथे थांबा होता. मात्र, मध्य विभागाचे मुख्यालय असून सुद्धा ही गाडी भुसावळात थांबत नव्हती. आता या गाडीला भुसावळ येथे थांबा मंजूर झाला आहे.
ही गाडी दिल्लीकडे जाताना दररोज रात्री ९.१५ वाजता भुसावळ स्थानकावर येईल. दोन मिनिटे थांबून ९.१७ वाजता दिल्लीकडे रवाना होईल. तर दिल्लीकडून मुंबईकडे जाणारी गाडी पहाटे ५.१५ वाजता भुसावळ येऊन ५.१७ मुंबईकडे निघेल. १० ऑक्टोबरपासून थांबा सुरू झाला.