जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले आहे. सणासुदीचे दिवस सुरु होताच सोन्याने विक्रमी उसळी घेतल्याने ग्राहकांना मोठी झळ बसली. मात्र आता मौल्यवान धातूत नरमाई दिसत आहे. दसऱ्यापूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. यामुळे ७६ हजारापुढे गेलेला सोन्याचा दर आता ७५ हजारावर आला आहे. दुसरीकडे काल चांदीचा दर स्थिर दिसून आला.ऐन सणासुदीत सोने ८० हजारांच्या तर चांदी १ लाखांच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र या आठवड्यात दोन्ही धातुच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने दसऱ्याला दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
काय आहेत सोन्याचा आज भाव?
मागील दोन आठवड्यात सोने दरात मोठी वाढ दिसून आली. या आठवड्यात मात्र सोन्याला सूर गवसला नाही. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी सोने प्रति तोळा ४०० रुपयांनी उतरले. मंगळवारी पुन्हा सोने दरात ४०० रुपयाची घसरण झाली. ९ ऑक्टोबर रोजी सोने ६०० रुपयांनी तर त्यानंतर काल १० ऑक्टोबर रोजी सोने २०० रुपयांनी घसरले. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ६८,७५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. या आठवड्यात सोने दरात तब्बल १६०० रुपयांची घसरण झाली.
दुसरीकडे चांदी दरात देखील या आठवड्यात मोठी घसरण झाली. सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी चांदीचा प्रति किलोचा दर ९३,००० रुपये इतका होता. ८ ऑक्टोबर रोजी त्यात १००० रुपयाची वाढ झाल्याने चांदीचा दर ९४००० रुपयावर पोहोचला. ९ ऑक्टोबरला मात्र चांदी १००० रुपयांनी घसरण तर १० ऑक्टोबर रोजी चांदी दरात तब्बल ३००० रुपयांची घसरण झाली. ११ ऑक्टोबरला चांदी दर स्थिर होता. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांदीचा प्रति किलोचा भाव ९०,००० रुपये इतका आहे.
दरम्यान, दसरा सण आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याला सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ६१७०० रुपये होते. त्या तुलनेत यंदाचे दर ७५००० (जीएसटीसह ७७ हजार) जवळपास १५ हजाराने महागले आहे.