जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । दिवसांपूर्वीच सुटीवर आलेल्या ३४ वर्षीय बीएसबी जवान भुषण आनंदा बोरसे यांचा शेत शिवारातून घरी परतताना अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द शेत शिवारात घडली. हा संपूर्ण प्रकार जवानाच्या वडिलांच्या डोळ्यासमोर झाल्याने त्यांनी एकच आक्रोश केला.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बलमध्ये कार्यरत होते. दरम्यान पाचोरा शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरात त्यांनी घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम नियोजित केला होता. यासाठी ते रजा घेऊन घरी आले होते. या दरम्यान ते दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले.
याच वेळी अचानक पावसाची रीमझीम सुरू झाली. तेव्हा हातातील घड्याळ आणि मोबाईल विजेपासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवले. यानंतर ते दुचाकीने शेतात गेलेल्या वडीलांना मदतीसाठी धाव घेतली. यावेळी वडिलांना बैलगाडी जुपुंन देत भुषण बोरसे हे स्वतः मोटरसायकलवरुन बैलगाडी मागे येत असतांनाच जोरात विजांचा गडगडाट झाला. क्षणार्धातच भुषण बोरसे हे मोटरसायकलवरुन जमिनीवर कोसळून त्यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार भुषण बोरसे यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर झाल्याने आनंदा बोरसे यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची वार्ता तालुक्यात पसरल्याने शोककळा पसरली.