जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । आगामी दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर येऊन ठेपले असताना दुसरीकडे सोने आणि चांदी दराने पुन्हा मोठी उसळी घेतली. यामुळे ऐन सणासुदीत दोन्ही धातूंचे दर वाढल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला आहे. जळगावच्या प्रसिद्ध सुवर्णपेठेत चार महिन्यांनंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचले आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७५ हजार रुपयावर गेला आहे.
दरवाढीचे कारण काय?
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात केल्याने जागतिक बाजारात किंमतीत वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात तुफान आले आहे. दुसरीकडे कच्चा तेलाच्या भाव निच्चांकी पातळीवर आले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत.
खरंतर २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा भाव कमी झाले. मात्र आता ऐन सणासुदीच्या तोंडावर दर वाढले. गेल्या आठवड्यात ७३ हजारांच्या आत असलेल्या सोन्याचे भाव १९ सप्टेंबरपर्यंत ७४ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. २० रोजी ३०० व २१ रोजी ५०० रुपये असे दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ झाली.
जळगावमधील आताचे सोने-चांदीचे दर
यामुळे आता जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७५ हजार १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ८९ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. मात्र सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ७७ हजार रुपयावर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
चार महिन्यांनंतर पुन्हा ७५ हजार पार
मे महिन्यात देखील सोने वधारून २० मे रोजी ते ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर भाव कमी झाले होते. आता चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा सोने ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचले आहे.