जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात मान्सून पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात काही अंशी पावसाने उसंत घेतलेली आहे. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे. म्यानमारजवळ २२ सप्टेंबर रोजी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या क्षेत्रामुळेच जळगाव जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून दमदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पाऊस झाल्यास त्याचा फटका खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
एकीकडे आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलच धुतलं आहे. यंदा सध्या तरी हे चित्र नसले तरी बंगालच्या उपसागरात म्यानमारजवळ तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सप्टेंबरअखेरीस जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जर हवेची दिशा बदलली तर मध्य प्रदेशात पाऊस होऊ शकतो. मात्र, सद्य:स्थितीत हवेची दिशा विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे असल्याने २२ सप्टेंबर रोजी तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र २५ सप्टेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत येऊ शकते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरअखेरीस पाऊस झाल्यास त्याचा फटका खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. आधीच जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीची वाढ खुंटली होती. तर उडीद व मुगाचे नुकसान झाले होते. सप्टेंबरअखेरीस कापूस वेचणीला सुरुवात होणार आहे. तर सोयाबीन काढणीही सुरुवात होईल अशा वेळेस जर पाऊस झाला. तर कपाशी व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
अशी राहणार स्थिती
२० ते २३ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
२४ ते २९ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पावसाचा अंदाज
३० सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होऊन, आगामी काही दिवस किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल.