जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२४ । राज्यात होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यातच आज शुक्रवारी जालन्यामध्ये बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेबाबत असे की, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस गेवराईकडून जालन्याच्या दिशेने जात होती तर मोसंबी भरलेला आयशर जालन्याकडून गेवराईच्या दिशेने येत होता. यावेळी अंबड वडीगोद्री रस्त्यावर मठ तांडा येथे दोन्ही वाहनांमध्ये समोरा-समोर धडक झाली.
ही धडक एवढी भीषण होती की बसच्या आणि ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. ट्र्कमधील मोसंबीचा रस्त्यावर खच पडला होता. बसमधून अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. अनेकांना गंभीर जखमा झाल्या असून स्थानिक नागरिकांनी जखमींना कसेबसे बाहेर काढत उपचारांसाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधित कुटुंबांना सूचना देण्यात आल्या आहेत.