जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । गणरायाला निरोप दिल्यानंतर उसंती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यासह जळगाव जिल्ह्यात ऐन पितृपक्षात जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर झाले. हे डिप्रेशन आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर पोहोचले आहे. याचा पावसावर अधिक प्रभाव राहील. विशेषतः पश्चिम, दक्षिण भागांमध्ये पाऊस सक्रिय राहील. बंगालच्या उपसागातील या प्रणालींच्या प्रभावाने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी कमाल तापमान ३५ अंश होते. यंदा १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान ३२ ते ३५ अंश तापमान राहण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे. विषम वातावरणामुळे २१ सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज कशी राहणार पावसाची स्थिती?
आज गुरुवार, (ता. १९ सप्टेंबर) संपूर्ण राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तसेच काही भागांमध्ये उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मुख्यतः आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.