जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळे गावच्या सरपंचाने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली. पांडुरंग गणेश तांबे (वय ४९) असं मयत सरपंचाचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
थेरोळे (ता. मुक्ताईनगर) येथील पांडुरंग गणेश तांबे हे कुटुंबियांसह राहत होते. शेती काम करून पांडुरंग तांबे हे परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यामध्ये होते, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. दरम्यान मंगळवारी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतामध्ये पांडुरंग तांबे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना ग्रामस्थांनी सुरुवातीला मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे अशी प्रतिमा त्यांची थेरोळे गावात होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.