धरणगावात कापूस खरेदीला प्रारंभ; जुन्या आणि नव्या कापसाला मिळाला इतका भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२४ । धरणगाव येथील श्रीजी जिनिंगमध्ये श्रीगणेश चतुर्थीच्या मुहर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मुहर्तचा भाव नव्या कापसाला ७,१५३ रुपये प्रतिक्विंटल तर, जुन्या कापसाला ८००० रुपये भाव देण्यात आला. येथे पहिल्याच दिवशी साधारण अडीच हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील श्रीजी जीनिंग उद्योगात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी खरेदीचा शुभारंभ श्री जी जिनिगचे संचालक नयन गुजराथी, सागर कर्वा, जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पहिल्याच दिवशी साधारण २,५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. या कापसाला ७,१५३ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. भावाची थोडी फार तफावत मालाच्या प्रतवारीनुसार बदलते, असे व्यापारी व जिनिंगचे संचालक यांचे म्हणणे आहे.
पहिल्याच दिवशी कापूस विकण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांचा जिनिंग संचालकांनी शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. कापूस खरेदीच्या या उद् घाटन समारंभाला श्रीजी जिनिंचे संचालकांसह गजानन साठे, किरण अग्निहोत्री, चेतन कोठारी, राजेंद्र कुमट, मुकेश बायस, संकेत चंदेल व कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.