जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । राज्यातील अनेक ठिकाणी मागील तीन चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १३ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र यंदा गणेशोत्सवातही पावसाचा धिंगाणा पाहायला मिळू शकतो.
कुठे कोसळणार पाऊस?
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलंय.
गेल्या आठवड्यात जळगावसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सलग तीन चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे जळगावसह अनेक जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, दुसरीकडे मुसळधार पावसाने झोडपल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजाने केली. यातच आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.दुसरीकडे विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जळगावात कसं असेल हवामान?
आज हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला कुठलाही अलर्ट दिला नाहीय. मात्र आज शुक्रवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.