जळगावात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७ जणांचे लचके तोडल्याने गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरातील अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातच शहरातील मोहननगरात पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांचे लचके तोडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय.
जखमींमध्ये २ लहान मुलांचा समावेश असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शहरातील दररोजचे ८ ते १२ जण हे कुत्रे चावून जखमी झाल्याने उपचारासाठी येत आहेत. शनिवारी महाबळ परिसरातील मोहननगरातील विनोद गजराती (वय ८) या मलाच्या मागे एक कुत्रा लागला. त्या मुलाच्या आवाजामुळे सुरेश माळी (वय ६०) हे हातातील बादली घेऊन कुत्र्याला पळविण्यासाठी गेले असता त्यांनाही चावा घेतला.
यावेळी आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यांनीही कुत्र्याला हाकलले. मात्र, या कुत्र्याने हरीश नाथानी (वय ५०), गणेश चौधरी (वय २६), गीतेश बाविस्कर (वय १३), मयूर ठाकरे (वय २९) यांच्यासह आणखी एकाला चावा घेतला. यावेळी इतर नागरिकांनी तत्काळ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले